तक्रार काहीच नाही …!
मी अनेक नोक-या केल्या आणि सोडल्या . शिक्षणाचंहि तसंच ! वकिलीचा कोर्स दुस-या वर्षी ( बारावीत आणि बी . ए . झाल्यावर ) सोडून दिला . बी. एड . झालो खरा ;पण खाजगी शिक्षणसंस्थांत नोक-या मिळाल्या . जबाबदा-या नीट पार पडतो म्हणून मुख्याध्यापक पदाच्याहि नोक-या मिळाल्या . कामात चुका झाल्या तर संस्थाचालक डाफरणार म्हणून कामात चुका करत नव्हतो . मला लहान मुलांत रमायचं होतं म्हणून मी खाजगी शिक्षण संस्थेत नोकरी पत्करली .
बालपण भाबडे असते . ( आपल्याला कळेल असं आणि बिगरनुकसानदायक खोटं मुलांकडून बोललं जातं ; नाही असं नाही ! ) पण मुलं ढोंगी नसतात. मी रमलो कारण मी स्वतःला ५ - १० या वयोगटातीलच समजतो ! ह्या वयोगटातल्या मुलांशी मी क्रिकेट , गोट्या ,चिन्नि - दांडू हे आणि यासारखे अनेक खेळ खेळत असतो ! मला माझं बालपण शोधावं लागत नाही ; ते मी जगत आहे .
आज मी शिकवणी घेत असतानासुद्धा मुलांना सांगतो कि , ' आय एम अ कोलर्नर ' . मुलांशी मी त्यांच्या टप्प्यातलाच संवाद करतो . माझं हे बालिश वागणं समाजातल्या अनेक थोरांना विचित्र वाटतं . परवाच्या अंनिसच्या मिटींगमध्ये गेलो असताना एकजण मला म्हणाले , ' तुझा बालीशपणा अजून गेला नाही वाटतं !' मी म्हणालो , 'जाणार कुठे …. तो आलेला नाही , मुळातच आहे ,सहजपणे जगलेला ! हे कृत्रिम नाही , नैसर्गिक आहे …मातीतलं ! ' हसले ते खळखळून !
धनगरवाडयावरच्या लोकांना आरोग्य सेवा आणि तिथल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करत असताना कलावतीमुळे मनोरुग्णांसाठी काम करायला लागलो . खरं म्हणजे यातलं काहीच मी ठरवून केलेलं नाही . मला दिसलं कि धनगरवाड्यावरच्या मुलांच्या अंगभर जखम आहेत : मी औषधोपचार व डॉक्टर ( डॉ . रवि कांबळे ) ना घेऊन वाड्यावर गेलो . पोरांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून गोष्टींच्या पुस्तकांबरोबर सर्व शैक्षणिक साहित्य पुरवले . त्यावेळी वाटायची कि , निसर्गातील गोष्टी ह्या मुलांना इतक्या माहित असतात कि त्यावर आधारितच अभ्यासक्रम यांच्यासाठी असायला हवा होता . असो !
उत्तर प्रदेशातल्या कलावती ह्या मनोरुग्ण महिलेने मला ह्या ठिकाणी काम करण्याचे अप्रत्यक्ष्यपणे सुचवले . तिच्या उपचार व पुनर्वसनाचा प्रश्न इतका तीव्र झाला कि , मला या विषयात ठोस काही तरी करण्याची गरज वाटू लागली होती . यापूर्वी बस स्थानकावर येणा-या बेवारस मनोरुगणांना खायला प्यायला द्यायचो , त्यांच्याशी बोलायचो . त्यांच्याबरोबरचा संवाद भावूक तर कधी विनोदी असतो . कारण कुठल्याही वेळी ते कुठलाही विषय कुठेही वळवतात , बंधन नाही ! सो कॉल्ड सुसूत्रता नाहीच ; नो रुटीन …. ओन्ली वंडरिंग ! कुठं वाट्टेल तिथे फिरून संध्याकाळी बस स्थानकावर हमखास येणारंच ! मग मी एक पत्रावळी , पाण्याचा ग्लास आणि जेवण घेऊन द्यायचो . पैसे नसतील त्या दिवशी मग बिस्किटे . पण पैसे असतील तेव्हा मग काहीही ! एकदा एका मनोरुग्णाला घेऊन मी बेकरीत गेलो आणि त्याला म्हटले ,( त्याला कुठली भाषा येते हे मला कधीच कळले नव्हते ; पण हिंदी येते ह्या सर्वसाधारण समजुतीनं ) ' तुम्हे इनमेसे जो भी चाहिये वो ले लो ! ' तो माझ्याकडे कौतुकाने हसत नुसताच बघायला लागला . मी पुन्हा तेच रिपीट केलं , आपली दाढी खाजवत त्याने काचेतल्या पदार्थांकडे बोट केलं . तो थोडा लांब असल्यामुळं मी त्या बोटाच्या दिशेतल्या सगळ्या पदार्थांतले थोडं थोडं खायला दिलं . ( त्या दिवशी पगार झाला होता ! ) त्यानं ते सगळं खाल्ल्यावर मला जे समाधान मिळालं ते त्याच्या तृप्तीपेक्षा कित्येक पटींनी जास्त होतं !
मी बिछान्यात पडल्यावर विचार करायचो कि , मी इथे मस्त झोपलो आहे पण ती / तो आता कुठे झोपला/ झोपली असेल ? मला अतिशय वाईट वाटायचे . कित्येकदा त्यांचीच स्वप्न पडायचीत ! पण मी काहीच करू शकत नव्हतो . पप्पा - मम्मींसाठी माझे हे वागणे भिकेचे डोहाळे होते , हा माझा वेडेपणा होता ( आजही ते आपल्या मतावर ठाम आहेत ! ) ! त्यामुळे त्यांना माझ्या घरी आणणं मला कधीच शक्य नव्हते ! ज्या दिवशी कलावती आजरा सूतगिरणी बाहेर सापडली त्या दिवसापासून आजपर्यंत मला वाटत आहे कि , आपले स्वतःचे मनोरुग्णालय असावे . पण मी नोकरी सोडून पूर्णवेळ हेच काम करू लागलो आणि पैशाकडून कोरा झालो .'श्रद्धा'चा पर्याय तेवढ्याच साठी मी ठेवला आहे !
कलावती नावाच्या उत्तर प्रदेशातल्या कुरा गावाच्या बेवारस मनोरुग्ण महिलेची शारिरीक अवस्था हिटलरच्या कॉन्संट्रेशन कॅम्पमधल्या ज्यू कैद्यासारखी झाली होती . बस स्थानकावर तिला मी पा हिली तेव्हापासून तिला खायला प्यायला देत होतो . तिला उकडलेली अंडी खायला देत होतो . माझ्या साल्वादोर व नौमान ह्या दोन मित्रांनिसुद्धा तिला खायला दिले आहे .जराशी अंगात ताकत आल्यावर ती आजरा सुतगीरणीपर्यंत चालत गेली होती . तिथून भर पावसात तिला उचलून आणेपर्यंत तिला अजिबात हालचाल जमत नव्हती . होस्पिटलमध्ये मी तिला फळे खायला देत होतो .तिचं बिछान्यावर शी सू करणं हॉस्पिटलवाल्यांना सोसेना म्हणून त्यांनी पर्याय शोधावा म्हणून मला सांगितले . पुन्हा तिला कुठे ठेवायचे हा प्रश्न आला ; आणि पुन्हा एकदा घराकडंचाच पर्याय सुचला ! घरातल्यांच्या भूमिका आडव्या आल्या . (खरं म्हणजे घरातले निर्णय अजूनही पप्पाच घेतात , त्यामुळे प्रश्नच नव्हता ! मला माझेपण कळायला लागल्यापासून मी माझ्या व्यक्तिगत निर्णयांवर पप्पांचा प्रभाव टाळत आलेलो आहे . याबद्दल त्यांना माझ्याबद्दल राग आहेच ; तो साहजिकहि आहे ! मी एका बापाचे मन समजू शकतो .ते त्यांच्या जागी योग्य आहेत !)त्यामुळं मी ग्रामीण रुग्णालयातल्या वार्डबॉयला विनंती करून तिला एखाद्या रिकाम्या कॉटेजमध्ये ठेवण्याची विनंती केली .मी येना-या ८ दिवसांत कलावतीला कुठल्या ठिकाणी उपचारांसाठी दाखल करता येईल याचा शोध इन्टरनेटवर घेऊ लागलो .जवळपास ११० च्या वर ngo ना मी इ - मेल केले .पण त्यांचे काहीच उत्तर आले नाही . शेवटी ' श्रद्धा ' बद्दल कळले . मला त्यांनी चांगला प्रतिसाद दिला . तिथले चेतन दिवाण आणि आकांक्षा मिश्रा असे दोन स्वयंसेवक तिला घेऊन जाण्यासाठी आले . मी मदत गोळा केली ; आणि स्वतः त्या दवाखान्यापर्यंत गेलो . मी दवाखान्यात फिरत असताना अतिशय हेलावलो . तिथल्या प्रत्येक मनोरुग्ण व्यक्तीबद्दल मला जिव्हाळा वाटू लागला होता . आणि या विषयावर काम करण्याचे मी ठरवले . आतापर्यंत उपचार होऊन परत आलेल्यांपैकी एक शामराव सोडला तर बाकी सगळे आपापल्या घरात ठीकठाक आहेत व त्यांची दैनंदिन कामकाजे सामान्य आहेत .
ह्या सगळ्या कामांसाठी नोकरीत नसल्यामुळे भरपूर वेळ देता आला . परंतु मी नोकरीत नसल्यामुळे मी आर्थिक हातभार लावत नव्हतो . मी एकुलता एक असल्यामुळे घरच्यांच्या माझ्याकडून अपेक्षा असणे साहजिक होते . मी आजपर्यंत घरच्यांच्या अपेक्षांची पूर्ती अगदीच खूप कमी वेळेला केली आहे . त्यामुळे त्यांना मी दोष देत नाही . नाही म्हणायला मी काही बांधकामे आणि संसारोपयोगी वस्तू घरी आणल्या . ज्यावेळी मी बाजार करायचो तेव्हा सगळे २ - ३ किलोने आणायचो . म्हणजे २-३ महिने बघायला नको ! पण नोकरीत नसल्याने मी आता करू शकत नव्हतो . त्यामुळे एक दिवस वडिलांनी कॉ . संपत देसाई . प्रा . सुनील गुरव व 'सकाळ'चे रणजीत कालेकर यांना घरी बोलवून माझा ' न्याय ' केला . माझं नोकरी आणि लग्न न करण्याच्या निर्णयावर खूप बॅकफुटवर गेलो ! मी घरातून बाहेर पडून समाजसेवा करावी असे सर्वानुमते ठरले.
आज ह्या गोष्टीला साडेपाच महिने झालेत . मी तालुक्यात भाड्याच्या खोलीत राहतो आहे . शिकवणीच्या पैशातून ' म्यानेज ' करत आहे . काहीच तक्रार नाही . कामही चांगलं चालू आहे ; पण मला घराकडची आठवण खुपदा व्याकूळ करते !
------------------------------------------------------------------------------------------------------------
अमित प्रभा वसंत
८००७४१५५६७